३० किलोमीटर आणि तेवढ्याच लांब गप्पा…

काल पुणे ते सासवड हा ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील एक महत्वाचा आणि अवघड टप्पा पूर्ण केला. गेली ४ वर्ष सातत्याने दर वर्षी एक टप्पा, मी व माझी मैत्रीण मृदुला, पूर्ण करत आलो आहोत. आत्ता पर्यंत, पुणे ते सासवड, सासवड ते जेजुरी, जेजुरी ते वाल्हे, वाल्हे ते तरंडगाव आणि तरंडगाव ते फलटण असे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. पुढच्या वर्षी आळंदी ते पुणे (२०२०) करण्याचा प्रयत्न राहील आणि मग उरलेले टप्पे. 
वारकऱ्यांबरोबर चालताना त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ह्या आमच्या साठी एक मोठा अनुभव असतो. कायम शहरात, शहरी वातावरणात किंवा केवळ शहरी लोकांबरोबर वावरणारे आपण, आपल्याच देशाच्या ग्रामीण जनतेशी तुटलेले असतो असे जाणवते. आपल्या घरात धान्य, भाजी येते ती केवळ मंडईतून असे आपण समजू लागलेलो असतो. मग ह्या वारी च्या निमित्तानी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. 
दर वर्षी वेगवेगळे अनुभव येतात पण साधारणतः दर वारीत आम्हाला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे “तुम्ही शहरी मुली एवढे चालू शकाल? कुठेतरी ह्या ग्रामीण जनतेला वाटत असते, आणि बरोबरच वाटत असते, कि शहरात कष्टाची कामे करावी लागत नाहीत. त्या मुळे आम्ही २०-२२ किलोमीटर कसे काय चालू, असा भाबडा प्रश्न येतो आणि आमच्या संवादाची सुरुवात होते. ह्या प्रश्नातील दुराभास पहा – विचारणारी व्यक्ती साध्या चपला घालून चालत असते. बहुतेक वेळेस आम्हाला त्या चपला तुटलेल्या व कश्याने तरी बांधलेल्या दिसत असतात. डोक्यावर एक छोटेसे, पण ३-४ किलो वजनाचे एखादे बोचके असते. पाण्याची बाटली बहुदा नसतेच, इलेकट्राल वगैरे तर दूरच. ह्यांच्या तुलनेत, आम्ही खेळासाठी उपयुक्त बूट घातलेले असतात, वजन हलकं असावं म्हणून छोटीशी पाठीवर बॅग, त्यात अगदी बदामांपासून ते पौष्टिक लाडूंपर्यंत सगळा जिन्नस भरलेला असतो. पाण्याची बाटली, इलेकट्राल ची वेगळी बाटली अशी तयारी असते. आणि ह्या परिस्थितीत त्यांना आमची काळजी वाटत असते, ह्याची गंमत वाटते.
आमच्या पॅन्ट-टी शर्ट चा पोशाख, लहान केस, कुंकू किंवा मंगळसूत्र नाही ह्याकडे पाहून आम्हाला लहान मुली समजले जाते. छान वाटते ! आमच्या वयाच्या बायका येऊन आम्हाला विचारतात कि त्यांच्या नातीसाठी असे कपडे कुठे मिळतील? कितीला मिळतील? मजा वाटते. एकाच देशात, नव्हे, एकाच महाराष्ट्र राज्यात आपण राहतो, पण राहणीमान एवढे वेगळे असू शकते, इतकी भिन्नता असू शकते, ह्याचे नवल वाटते. असे म्हणतात ना कि जागतिक शहरी जनता एकमेकांजवळ, एकमेकांसारखी असते. पण एकाच देशातील शहरी आणि ग्रामीण जनता एकमेकांपासून खूप वेगळे असतात. ह्याची प्रकर्षाने जाणीव वारीत होते. पहा ना, मी किती सहजपणे अमेरिकेत किंवा युरोप च्या शहरात कामानिमित्त जाऊन येते. तिथे आपल्या हुन वेगेळ्या पण जीवनमान सारखे असणाऱ्या लोकांमध्ये सहज वावरते. पण आपल्याच देशातील गावात मला इतक्या सहजपणे राहता येईल का, अशी शंका येते. 
दर वर्षी एका महत्वाच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव होते. ग्रामीण भागात मुलींची लवकर होणारी लग्न आणि त्या नंतर लगेच होणारी मुलं. माझ्या मुलांच्या वयाची मुले असणारी बाई माझ्या पेक्षा किमान १० वर्षांनी लहान असते. ह्या बायका आमच्या पाशी चटकन बोलून जातात – “फार घाई करतात लग्नाची गावाकडे. १६ व्या वर्षीच माझे लग्न लावून दिले”. असे गाऱ्हाणे बऱ्याचदा ऐकू येते. तेव्हा मात्र फार वाईट वाटतं. शहराच्या केवळ काहीच किलोमीटर अंतरावर अजूनही मुलींची लवकर लग्न आणि लवकर मुलं हे चक्र काही अजून थांबताना दिसत नाहीये. हे बायकांचे लग्न, चूल आणि मूल हे चक्र कधी बदलणार? आजही लहान मुलींना भीती वाटत असते ती लवकर लग्न लावून देण्याची. आणि ही परिस्थिती बदलेल ह्याची आशा त्यांना दिसत नाहीये, ही खरी खंत.

अशीच एक आजी आणि तिची १७ वर्षाची नात आम्हाला भेटल्या. आजीचे वय केवळ पन्नाशीत. नातीची नुकतीच दहावी झाली होती. आजी आम्हाला सांगत होती – “तुमी बाया सांगा हिला. अकरावी शिकायचे नाही म्हणते. शिक्षणाशिवाय कसे काय व्हायचे?” ह्या वरून लगेच कळते की शिक्षणाचे महत्व अगदी छोट्या खेड्या-पाड्या पर्यंत पोचलेले आहे. एक कर्तव्य म्हणून, मी नातीला विचारलं, “काय ग, का नाही पुढे शिकायचं? नात एकदम स्मार्ट निघाली. म्हणाली, “ताई, अहो नुसतच ११ वी , १२ वी  शिकून काय करू? नर्स व्हायचे आहे मला. त्याचे शिक्षण मिळाले तर तिथे जायचे आहे. उगाच नुसती शाळेत जाऊन काय करू?”
ह्यावरून आपल्या निरर्थक शिक्षण पद्धतीची जाणीव होते. ग्रामीण भागात सुद्धा तरुण-तरुणी आता जागरूक आहेत. काय हवे आहे, काय करायचे आहे ह्याचे ज्ञान बऱ्याच जणांना आले आहे, पण चुकीची शिक्षण पद्धत असल्या मुळे ह्यांना वेगळ्या वाटेवरून जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यांच्या दृष्टीने, केवळ ११ वी , मग १२ वी आणि त्या नंतरची डिग्री जर त्यांचे पोट भरणार नसेल, तर त्याचा काय उपयोग?

सध्या माझ्या केसांचा रंग मी खूप फ़ीका केला आहे. जवळ जवळ सोनेरी. असच आपलं ! माझे केस पाहून १-२ जण येतात – “व्हेर इज युअर कंट्री?”  मग मला माझा पुणेरी आवाज, नव्हे, पुणेरी शाब्दिक धार बाहेर काढावी लागते. “अहो, मी पुण्याची”, असे ठासून सांगावे लागते. मग मागे थोडा वेळ कुजबुज ऐकू येते आणि लक्षात येतं की काही काळ मी त्यांच्या चर्चेचा विषय असणार आहे. मनातल्या मनात हसू येतं.  

अजून एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, शहरी जीवनात हल्ली सर्वच गोष्टी किती मुबलक उपलब्ध आहेत ह्याची होणारी भावना. आळंदी ते सासवड हा पुण्याच्या भोवतालच्या परिसरात देणाऱ्यांची वृत्ती सुद्धा मुबलक झाली आहे. सगळंच ओसंडून वहात असते. जेवण, पाणी, भक्ती आणि प्रेम सुद्धा. जस जसे पुण्यापासून लांब जाऊ, तसे गावो गावी रस्त्याच्या कडेने लोक हात जोडून उभे असतात. पण इथे कसलाच गोष्टींचा, जेवणाचा दिखावा, मुबलकता नसते. असतो तो केवळ भक्तिभाव आणि स्वतःच्या घरी वारकऱ्यांना नेऊन, त्यांना जेवू घालण्याची इच्छा. तिथे रस्त्यांचा कडेला कंपन्या स्टॉल टाकत नाहीत, तिथे टेबलं भरून जेवण ठेवलेले दिसत नाही. पण तरीही वारकऱ्यांची जेवायची सोय होत असते. वारकरी संतुष्ट जेवतो, अन्न नासत नाही, वाया जात नाही. ह्या गोष्टी वर नक्कीच विचार करायला हवा. एखाद्याला अगदी मनापासून काही देताना सुद्धा, त्यात किती अपव्यय होतो आहे ह्याचे भान ठेवायला हवे. कारण बहुतांशी ठिकाणी, अति मुबलक गोष्टी मिळाल्याने अन्न अगदी वाया जाताना दिसत होते. 

तसेच, देणाऱ्याचे जसे सामाजिक भान असते, तसेच देणाऱ्याने पर्यावरणाचेही भान ठेवावे असे पदोपदी जाणवते. केवळ एकाच ठिकाणी आम्हाला लक्षात आले कि जेवण वाटप केल्या नंतर वारकऱ्यांकडून टाकून दिले जाणारे द्रोण, कप हे पद्धतशीरपणे उचलले जात होते. बाकी सर्व ठिकाणी रस्त्यावर उरत होता तो प्रचंड प्रमाणात वाया गेलेले अन्न आणि कचरा. सरकारी यंत्रणा कार्यरत केलेली असते, पण अन्न-पाणी  वाटणाऱ्यानेच जर थोडासा ह्याला हातभार लावला तर वारकऱ्यांना एक पर्यावरणाचा संदेश ही दिला जाईल.  


माझ्यासाठी दर वर्षी वारीत चालणे म्हणजे एक प्रकारचा माणसे जोडण्याचा अनुभव. स्वतःला स्वतःशी जोडणे, तसेच स्वतःला ह्या देशाच्या मातीशी, माणसांशी जोडणे. वर्षातून एकदा का होईना, पण समोर चालणाऱ्या आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या तुटलेल्या चपलेकडे पाहून आपल्या सुख-सोयीची जाणीव होते. चालता चालता अगदी अशिक्षित आजी जेव्हा जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगून जाते, तेव्हा होणारी एक वेगळीच भावना अनुभवायला मिळते. आपल्या उच्च शिक्षणाचा थोडासा तरी गर्व कमी होतो. मुल कडेवर घेऊन आलेली मध्यम वयातली एक आई, आपली एक वेगळीच करुण कहाणी ऐकवून कायमची आपल्या मनाशी जोडून राहते. पाऊस व त्या वर उत्पन्न असलेले हे वारकरी इतके सहजपणे अध्यात्मिक असतात ह्याची जाणीव होते . खिशात एकही रुपया नसताना, विठ्ठल नक्की माझी सोय करेल, असा विश्वास दाखवणारे वारकरी, अनेक दिवस मनातून जात नाहीत – माझ्याशी मन जोडून राहतात.


ह्या ‘जोडण्याच्या’ कार्यक्रमातून मी नक्की काय साधते आहे असा प्रश्न मला कधीतरी पडतो. कदाचित ह्यातून माझ्या पुढील आयुष्यात मी काय कार्य करायचे ह्याचा मार्ग विठ्ठल मला दाखवेल अशी भावना घेऊन मी माझी पावले, दर वर्षी, पंढरीच्या दिशेने टाकते आहे.  

No Comments

Post A Comment