ही निवडणूक केवळ मोदी-समर्थक विरुद्ध मोदी-विरोधक

२०१४ची सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एनडीए युतीला संपूर्ण बहुमत देणारी होती आणि १९७० च्या  दशकानंतर देशात पूर्ण बहुमताचे सरकार प्रस्थापित झाले. फार क्वचितच भारतासारख्या विविधतापूर्ण देशात राजकीय मत विभागणी केवळ दोन भागात झालेली दिसते. इंदिरा गांधीं च्या आणीबाणी नंतर अश्या प्रकारचे राजकीय विभाजन दिसून आले होते. 
२०१९ ची सार्वत्रिक निवडणूक एका दृष्टीने अशीच केवळ दोन भागात विभागून होणार अशी चिन्ह आहेत. लोकतंत्र धोक्यात आले आहे ह्या मुद्द्यावर जनमानस विभागता येतो ह्याचा पुरेपूर फायदा सध्या घेतला जात आहे. ह्याची प्रचिती १९७५ च्या काळातील निवडणुकीत आलेली आहे. त्यामुळे सरकार विरोधी फारसे मुद्दे मिळत नाहीत हे कळल्या नंतर सरकार विरोधी जनमानस करण्याचा रामबाण उपाय निघाला  – लोकतंत्र आणि भारताची सहिष्णु असल्याची परंपरा धोक्यात आहे ह्या मुद्द्यावर राजकीय प्रचार करायचा. 
ह्या मुळे आज एकंदर चित्र असे दिसते आहे की मतदार एकतर मोदी-समर्थक आहे किंवा मोदी-विरोधक. ह्या प्रकारची विभागणी इतकी प्रखर आहे की असे ऐकू येते की परिवारांमध्ये आणि अनेक वर्ष मित्र असलेल्यांमध्ये देखील फूट पडली आहे. ह्या अगदी पारिवारिक लढायांमधून एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे, कुठलाच गट आज दुसऱ्या गटाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. मतभेद, वाद-विवाद हे सकारात्मक आणि शिकवणारे असू शकतात जेंव्हा वादाचा मुद्दा सारखा असतो. पण मोदी-समर्थक आणि मोदी-विरोधक ह्यांच्यात सखोल, सुसूत्र वाद होऊच शकत नाही कारण दोन्ही गट हे जणू आपापल्या स्वतंत्र ग्रहांवर उभे आहेत. पूर्वी एक अतिशय सुंदर पुस्तक मिळायचे, “Men are from Mars and Women are from Venus”,  तसाच काहीसा हा प्रकार झाला आहे.
पण ह्यातून निवडणुकीत बोध घेण्याचा असा की  मतदार केवळ दोन गटात आहेत. मोदी-समर्थकांना समोर मोदी ह्यांचे नेतृत्व दिसत असल्या मुळे, त्यांचे मतदान स्वच्छ, सोपे आहे. स्थानिक पातळीवर मोदींचे बळ वाढवेल अश्या भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचे. मोदी-विरोधकांचे मतदान मात्र एवढे सोपे नाही. मोदींना विरोध हा ह्या गटाचे ध्येय असल्या मुळे मतदान जो कोणी मोदी पंतप्रधान होण्यासाठी हातभार लावणार नाही त्याला द्यायचे असा विचार आहे. ह्या मुळे, ह्या गटाचे मतदान सकारात्मक नाहीये – म्हणजे आपल्याला आवडतो किंवा पटतो अश्या नेत्यासाठी केलेले हे मतदान नसून, एका प्रस्थापित नेत्याचा नकार करणारे हे मतदान आहे. ह्या पद्धतीच्या मतदानातून काय नवे व बहुदा आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळतील ह्याचा अंदाज नाही. म्हणजे, मोदी-विरोधक त्यांचे मत कुठल्या दुसऱ्या पक्षाकडे किंवा उमेदवाराकडे वळवतील हा अंदाज बांधणे आज अशक्य आहे. 
अजून एक महत्वाची बाब निवडणुकीपूर्व सर्वेक्षणातून लक्षात येते आहे. ती म्हणजे, मोदी-समर्थक गट हा सर्वाधिक महिला व युवा मतदार ह्यांचा आहे. तसेच व्यावसायिक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर मोदी-समर्थक गटात आहेत. ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे कारण महिला आणि व्यावसायिक व्यक्ती क्वचितच आपली राजकीय मत चार चौघांच्यात मांडतात. साहजिकच, अपवाद आहेतच. पण सध्याच्या दोन गटातील हमरी-तुमरी वर आलेली भांडणे पहिली की लक्षात येते की अनेक वेळेस मोदी-विरोधक नवऱ्याशी रोज वाद न घालता शांत राहणारी ह्या घरातील मोदी-समर्थक महिला, मतदान मोदींच्या बाजूने करेल. तीच गोष्ट व्यावसायिक व्यक्तींची. कुठेही आपले मत सध्या न मांडणारा गट मतदानाच्या दिवशी मात्र मोदी-समर्थन करेल अशी चिन्ह आहेत.   
ह्या कारणामुळेच की काय २०१९ च्या निवडणुकीचा प्रचार एकंदरच शांत आहे. दोन्ही गटांना मनोमन माहिती आहे की आपण एका गटातून मतदार दुसऱ्या गटात आणू शकत नाहीये. निवडणुकीच्या तोंडावर साधारणतः संपूर्ण देशात एक चलबिचल जाणवते. विशेषतः विरोधक गटातून सरकार विरोधी किंवा सरकारच्या माथ्यावर कलंक लावणारे आरोप होतील अश्या प्रकारचे वातावरण असते. पण आज विरोधी गटाला कळून चुकले आहे की अश्या प्रकारचे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठलेही प्रकार घडून आणले तरीही मोदी-समर्थक त्याच्या मतदानापासून विचलित होणार नाही. तसेच, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने केलेली कामे, धोरणे ह्यांवर भर देऊन मोदी-विरोधक मतदार आपले मत बदलेल अशी चिन्ह नाहीत. आता उरले, नवे निर्वाचित मतदार – १८ ते २२ वयोगटातील तरुण-तरुणी. ह्या वयोगटाशी थेट संपर्क साधायचा असेल तर तो केवळ आणि केवळ सोशल मीडिया वरूनच होऊ शकतो. आणि हा वयोगट सुद्धा गेली अनेक वर्ष, दिवस अन रात्र आपापल्या फोने वरून, टॅब वरून, लॅपटॉप वरून इतका सर्व विचारांशी संपर्कात आहे की बहुतेक प्रमाणात ह्या नव्या मतदाराची सुद्धा विभागणी कुठल्या ना कुठल्या गटात आधीच झालेली आहे. विशेष म्हणजे, पूर्वी निरागस वाटणारा हा नवा मतदार चाणाक्ष ,खूप लवकरच राजकीय घडामोडींशी परिचित झालेला आहे आणि आपले मत पक्के असणारा आहे. 
मतदान हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. मतदान करताना आपले मत सकारात्मक पणे द्या. आपल्या देशात जे बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते घडवून आणण्याची क्षमता कोणात आहे, ह्याचा विचार करा? आपले मत अश्या व्यक्तीला द्या ज्या मध्ये देशाचे नेतृत्व सबळपणे करण्याची ताकद, काबिलीयत आहे. केवळ मतभेद आहेत म्हणून वैयक्तिक पातळीवर विचार करून नकारात्मक मतदान करू नका. देशाची आजची गरज काय आहे हे ओळखा. उंबरठ्यावर असलेला आपला देश – ह्या देशाचे कर्तृत्वान व स्थिर सरकार असण्याची गरज आज मतदाराने ओळखलीच पाहिजे. खोकले नेतृत्व आणायला आपल्या मताचा वापर होईल असे मतदान करू नका. विचार करा, की आपण केवळ आपला मुद्दा सर करण्यासाठी नकारात्मक मतदान तर करत नाही ना? दिशाहीन नेतृत्वाला आपण खत-पाणी घालत नाही ना, ह्याचा विचार करा? शेवटी, तुमचे मत जरीही खासगी, मतपेटीत बंद होणार असले तरीही तुमच्या ह्या हक्क बजावण्यानी देशाची दिशा निश्चित होणार आहे.  
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान जस जसे जवळ येत आहे तसे दोन गटांमध्ये चर्चा बंद होण्या कडे वाटचाल झाली आहे. निवडणुकीचे निकाल बऱ्याच अंगातून, चष्म्यातून पाहून घेता येतात, त्याचे अनेक प्रकारे विश्लेषण होऊ शकते. पण शेवटी सरकार जो कोणी प्रस्थापित करेल तो लोकतंत्राच्या अग्नी परीक्षेतून बाहेर सुखरूप पोचलेला असेल. आता मतदान करायचे आणि केवळ २३ मे ची वाट पाहायची. ह्या दिवशी आणि केवळ ह्याच दिवशी दोन्ही गटांना कळणार आहे की खरा जनमानस काय ! 

No Comments

Post A Comment