मतमोजणी केंद्रावरील अनुभव – २०१९ लोकशाही महोत्सवाची सांगता

बरोबर सकाळी ८ वाजता पहिले इ.व्ही.एम, आपल्या स्वतःच्या पेटीत बंदिस्त, प्रत्येक टेबल वर पोचले. 

मतमोजणी केंद्राची एक विशिष्ठ रचना असते. ह्या केंद्रासाठी एक मोठी, फारसे कॉलम नसलेली व प्रशस्त जागा लागते. त्या मुळे, धान्य गोदामे ह्या प्रक्रियेसाठी सज्ज केली जातात. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मोजणी साठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ह्याचे कोरेगाव पार्क येथील गोदाम तयार केले होते. 

प्रत्येक गोदामाच्या इमारतीच्या आत, मधली संपूर्ण जागा लोखंडी जाळ्या किंवा साखळीचे कुंपण घालून सुरक्षित केलेली असते. ह्याच्या आत टेबले मांडून, प्रत्येक टेबल वर ४ ह्या प्रमाणे इलेक्शन ड्युटी वरील अधिकारी बसायची सोय केलेली असते. ह्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस, आतील प्रक्रिया पाहता येईल अश्या खुर्च्या मांडलेल्या असतात. इथून राजकीय पक्षाच्या सर्व प्रतिनिधींना आतील प्रक्रिया पाहता येते. वास्तविक म्हणजे, त्यांना दाखवूनच ही प्रक्रिया पार पाडली जाते.

ह्या प्रक्रियेचे जे केंद्रबिंदू आहे ते हे छोटेसे इ.व्ही.एम बाहेर आणले गेले की सर्व प्रथम ते पूर्णतः सील बंद आहे ह्याची खात्री केली जाते. बहरून पाहणारे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे सील पडताळून पाहू शकतात. अनेक ठिकाणी सील असल्या मुळे, सर्व ठिकाणी कटर चा वापर करून सील काढण्यात  येते.

प्रत्येक सील काढताना इ.व्ही.एम चा नंबर पहिला जातो. राजकीय उमेदवारा कडे प्रत्येक पोलिंग बूथ ची इ.व्ही.एम च्या नंबर ची यादी आधीच पोचलेली असते. त्या प्रमाणे, पक्षाचे प्रतिनिधी, आपापल्या लिस्ट मध्ये बघून ह्याची खात्री करून घेतात.  तसेच, पक्षांनी दिलेल्या अनेक फॉर्म वर, माहिती भरून घेतात. 

एकदा सर्व सील काढले गेले कि शेवटचा भाग राहतो. तो म्हणजे “RESULT” चे बटण कागदी सील च्या खालून कापून बाहेर आणणे. हे काम अगदी अलगद, व जणू एखाद्या पूजेचा भाग आहे, अशी केली जाते. सर्वांचे लक्ष तिकडे असते, व इलेक्शन अधिकारी सावकाश, अलगद वरचा पेपर कापतो व आत पिवळे बटण दिसू लागते. 

मग इ.व्ही.एम सुरु केले जाते. त्याच्या खिडकीत त्या बद्दल ची सर्व माहिती प्रक्षेपित होऊ लागते. पोलिंग ची तारीख, पोलिंग ची सुरुवात झालेली वेळ, बंद झालेली वेळ. अखेरीला इ.व्ही.एम दाखवते की बाहेरील कुठलेही साधन मला जोडलेले नाही, त्या मुळे पुढील कार्यासाठी मी सज्ज आहे. 

ह्या वेळेस RESULT चे बटण दाबले जाते व एका मागून एक प्रत्येक उमेदवाराची मत संख्या दिसू लागते. एकूण मतं किती आहेत, त्या पैकी कोणाला किती अशी माहिती दिसायला लागते आणि बाजूला बसलेले सर्व प्रतिनिधी ही माहिती आपापल्या जवळ असलेल्या फॉर्म्स वर उतरून घ्यायला लागतात. इलेक्शन अधिकारी त्यांचे ऑफिशिअल फॉर्म्स देखील भारतात. संपूर्ण माहिती दिसून संपली की पुढील प्रक्रियेला सुरुवात होते. लिहून घेतलेल्या माहिती च्या फॉर्म्स वर निरीक्षक सही करतात. ते फॉर्म पुढे एकत्रित निकाल करण्यासाठी पाठवले जातात व त्याची एक एक प्रत प्रत्येक राजकीय प्रतिनिधी कडे दिली जाते. 

साधारणतः ही प्रक्रिया पूर्ण व्हायला २० मिनिटे लागतात. त्या मतदारसंघात किती उमेदवार आहेत ह्या वर ही वेळ अवलंबून असते. पुणे लोकसभा मतदारसंघात ह्या वेळेस ३२ उमेदवार होते. त्या मुळे ३२ उमेदवारांची मत संख्या दाखवून उतरवायला वेळ लागतो.  इथे एक प्रकर्षाने जाणवले म्हणजे, पहिले ४-५ पक्षांचे अधिकृत उमेदवार सोडले तर बाकी अपक्ष उमेदवारांना जवळ जवळ ० किंवा जास्तीजास्त ५ मते प्रत्येक फेरीत पडत होती. एकंदरच ह्या उमेदवारांनी अश्या प्रकारची निवडणूक लढून नक्की काय मिळवले हा प्रश्न मनात आल्या शिवाय राहात नाही. 

ह्ये वर्षी च्या मत मोजणी प्रक्रियेत थोडा विलंब झाला. विशेषतः बारामती पेक्षा पुण्याची मत मोजणी खूप उशिरा पर्यंत सुरु राहिली. ह्याचे कारण असे कि काँग्रेस च्या उमेदवारांनी हरकत नोंदवली. ह्या हरकती प्रमाणे, एका ई.व्ही.एम ची मोजणी व एका फेरीची मोजणी संपूर्ण झाल्या वरच, त्या फेरीचा निकाल जाहीर केल्या वरच पुढील ई.व्ही.एम ताब्यात दिले गेले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. ह्या मुळे, ही संपूर्ण प्रक्रिया पार पडायला एका ई.व्ही.एम ला १.५ तास लागत होता.  

जेवणानंतर मतमोजणीला जरा वेग आला. एका विधानसभा मतदारसंघात १८ टेबले होती व प्रत्येक टेबल वर २१ ई.व्ही.एम येणार होते. म्हणजे प्रत्येक टेबल ने २१ मतमोजणी फेऱ्या पूर्ण करायच्या होत्या. सकाळी ८ वाजता सुरु झालेली ही प्रक्रिया सायंकाळी ८ वाजता संपली. काही हरकती नोंदविल्या गेल्या – त्या सोडविल्या गेल्या. एका टेबल वरील ई.व्ही.एम सुरु झाले नाही म्हणून त्या तील ४००-६०० मतांची मोजणी नंतर करायची असे ठरविले गेले. 

एका बाजूला मतमोजणी ची यंत्रणा सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत सुरु असते, त्याच प्रमाणे सर्व मुख्य राजकीय पक्ष देखील आपापली मतमोजणी यंत्रणा सुरु ठेवतात. ऑफिशिअल आकडेवारी तयार होण्या आधीच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपली आकडेवारी तयार करत असतात. प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक वॉर्डात, वॉर्डाच्या विशिष्ठ भागात कुठे किती मतदान झाले ह्याचे विश्लेषण बाहेर सुरु असते. कार्यकर्त्यांना अचूक माहिती कळू शकते की कुठल्या भागात कोणासाठी मतदान झाले, किती फरकाने झाले. ह्या सारखी माहिती राजकीय पक्ष फार सचोटीने जमवतात व त्यावर नवडणूक पूर्वी बरीच चर्चा होत असते. काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडे ह्या वेळेस मोठी फाइल पक्षाने दिली होती. सर्व उमेदवारांची मते लिहून, बाकी अनेक फॉर्म्स भरून ह्या पक्षाचे प्रतिनिधी करत होते. भारतीय जनता पक्षाने देखील छोट्या स्लिप्स च्या मार्फत ही माहिती मिळवली. NOTA ची मते सुद्धा लक्षात घेण्यात आली. 

NOTA चे मतदान ह्या वेळेस फारच नगण्य झाले. साधारणतः विश्लेषण केले तर असे लक्षात येते की एका ई.व्ही.एम मध्ये ३०० ते ८०० मते पडली होती, प्रत्येक ई.व्ही.एम चे वेगळे आकडे होते जे त्या त्या भागातील मतदार यादी व तिथे झालेल्या मतदान टक्केवारी वर अवलंबून होते. पहिले ४ उमेदवार – ब. स.प  चे श्री शिंदे, भ.ज.पा. चे श्री. बापट, काँग्रेस चे श्री. जोशी व वंचित विकास आघाडीचे श्री. ____ ह्यांना मिळून ९९% मते होती. पुढील बाकी सर्व २८ उमेदवारांना, ० ते ४ ह्या पट्ट्यात मते मिळाली. तसेच NOTA चे झाले. एखाद्या ई.व्ही.एम मध्ये NOTA  ला ८ मते मिळाली. त्यामुळे NOTA फॅक्टर ह्या वेळेस अजिबातच नव्हता असे म्हणता येईल. 

हे सगळे आकडेवारी चे विश्लेषण व त्यावर उद्भवणारी चर्चा पाहून मनात विचार आला की हे क्रिकेट मॅच सारखे आहे. तिथे असलेले राजकीय प्रतिनिधी मागील निवडणुकीत झालेल्या आकडेवारीची उजळणी करत होते. किती मतांची आघाडी कुठल्या भागातून मिळेल ह्या बद्दल अंदाज बांधत होते. अनेक जण ज्यांनी अनेक निवडणुकीत हे काम केले आहे, ती मंडळी ही आकडेवारी अगदी सहज पणे आठवून सगळ्यांना सांगत होते. एकंदरच, खेळी मेळीचे वातावरण होते, एखादा चुरशी खेळ पाहताना असते तसे.

ह्या सगळ्या प्रक्रियेक एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे इलेक्शन ड्युटी वर असलेले तुमच्या-आमच्या सारखे आपले भारतीय बांधव व त्यांची चिकाटी आणि एकाग्रीपणा! ही मंडळी जणू काही धर्माचे, देवाचे काम करीत आहेत ह्या भावनेने तिथे चिकाटीने काम करताना पाहिले. देशासाठी सरकार निवडण्याचे काम जणू देवाचेच काम आहे अशी भावना तिथे जाणवली. त्यांचे ध्यास घेऊन अतिशय पद्धतशीर व मेहेनतीने काम पाहून खरंच वाटले की आपल्या देशातील लोकशाही ह्याच मुळे टिकून आहे. १२ तास सलग ड्युटी झाल्यानंतर सुद्धा, पुढील VVPAT ची प्रक्रिया पूर्ण करूनच ह्या अधिकाऱ्यांनी त्यांचे काम संपवले. ह्यांच्यातील अनेक जण गेली २ महिने वेगवेगळ्या पोलिंग बूथ वर ड्युटी वर होते. तिथे देखील २०-२० तास ह्या लोकांनी काम केले होते. कुठलीही तक्रार न करता. या प्रकारच्या प्रामाणिक व ध्यास घेणाऱ्या मनुष्यबळानेच आपल्या इलेक्शन कमिशन ला सर्व नियम पाळून काम करता येते ह्याची जाणीव झाली.   

तसेच दुसरी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण पारदर्शिक व्यवहार करण्यासाठी म्हणा, किंवा एखादे काम व्यवस्थित होण्याकरिता म्हणा, अनेक नियम बनवतो. बऱ्याचदा हे नियम पालनाकरिता किती वेळ व किती पैसा आपण खर्च करणार आहोत व ह्यातून नक्की काय सध्या होणार आहे ह्याचे भान राहतेच असे नाही. पण तरीही, मतमोजणीचे काम पारदर्शी व पद्धतशीर पणे कसे पडू शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या इलेक्शन कमिशन चे काम!  प्रत्येक प्रक्रियेसाठी नियम व हि नियमावली सतत बरोबर बाळगून, प्रत्येक हरकती वर मार्ग शोधून काढून मतमोजणी पुढे सरकत होती. ह्या संपूर्ण प्रक्रियेचे विडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केले जात होते. 

एकंदरच मतमोजणीचे पद्धतशीर काम पाहून काल  हजारो वेळा तरी मी स्व. टी . एन. शेषन च्या स्मृतीस वंदन केले. त्यांच्या पुढाकारातून व दूरदृष्टीमुळे आज आपल्याला व पुढील पिढ्यांना जगातील एक सुंदर निवडणूक प्रक्रिया अनुभवायला मिळते आहे. पद्धतशीर . पारदर्शी . 

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीला आपल्या इलेक्शन कमिशन ने “लोकशाही का महोत्सव” असे नाव दिले आहे. आणि खरोखरीच मतमोजणी नंतर ह्या अतिशय सुंदर महोत्सवाची सांगता झाली. कोणी जिंकले. कोणी हरले. पण महत्वाचे म्हणजे, लोकशाहीत मतदान करणाऱ्याचे मत सर्वात उंच, महत्वाचे व उच्च स्थानावर नेऊन ठेवले. कोणाच्या ही वैयक्तिक मतभेदांवर हे अवलंबून नाही. जर लोकशाहीतील बहुमत एका दिशेने जात असेल तर तीच दिशा बरोबर!  हेच लोकशाहीचे परम सत्य आहे, नाही का?  

No Comments

Post A Comment