त्रिपुरा मध्ये भा.ज.पा चा ऐतिहासिक विजय : ईशान्याकडे एक नवे पर्व सुरू होण्याची चाहुल

आज संध्याकाळी, पुण्यात त्रिपुरा विधानभवन निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार, श्री. सुनिल देवधर जी ह्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. ३ मार्च रोजी मिळवलेला हा ऐतिहासिक विजय नक्कीच लाक्षणीय आहे ह्याची जाणीव होती, पण आज देवधरजींच्या वक्तव्याने त्रिपुरा मधील विजय खरच किती मोठा आणि महत्वाचा आहे हे प्रकर्शाने लक्षात आले. तसेच भा.ज.पाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काय अपार कष्ट व मेहनत केली आहे ह्याची जाणीव झाली व खूप कौतुक वाटले.

त्रिपुरा मध्ये निवडणूक लढवायची आहे व दमदार धडक CPI (M) ला द्यायची आहे ह्या उद्देशाने देवधरजी त्रिपुरा मध्ये जेव्हा दाखल झाले तेव्हा भा.ज.पा च्या सभेत व्यासपीठावर आठ कार्यकर्ते तर प्रेक्षकात केवळ ३-४ श्रोते, असे चित्र होते. अश्या परिस्थिती पासून त्रिपुरा विधानसभा जिंकून आणायची म्हणजे फारच अवघड काम होते.

देवधरजींनी त्रिपुरा मध्ये असणाऱ्या राजकीय परिस्थिती चे नेमके वर्णन केले आणि जमलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आल्या वाचून राहिले नाही. अंगावर काटा उभा राहिला. भ्रष्टाचार किती होऊ शकतो आणि राज्याकर्ते किती असंवेदनशील राहू शकतो, ह्याचे उदाहरण म्हणजे त्रिपुरा! राजकीय दहशत एवढी की CPI चे कार्यकर्ते नसाल तर एखाद्या रात्रीत तुम्ही गायब केले जाऊ शकता. त्रिपुरा सारख्या छोट्या आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात महिन्यात सरासरी १०० लोक गायब होतात. आणि ह्या परिस्थिती कडे २० वर्ष सलग खुर्चीवर बसलेले मुख्यमंत्री हे थांबवू शकत नाहीत ?

डावी विचारसरणी अंमलात आणण्याच्या नादात, CPI ने त्रिपुरा मध्ये विकासालाच सुरूंग लावला. कोट्यावधी पैशांचे अनुदान केंद्र सरकार कडून येऊन सुद्धा, एक रस्ता नीट बांघला गेलेला दिसत नाही. केंद्र सरकार चे पैसे घेताना अटींची पूर्तता करताना मात्र मोठे मोठे फलक लावले आहेत, ज्यावर रस्त्यांवर केला जाणारा खर्च, त्याची निगा ठेवण्यासाठी केलेली पैशाची तरतूद नमूद केलेली दिसते. पण शेजारी रस्ताच नसतो. असतो ती एक कच्च्या मातीची पाऊलवाट ! ह्या पद्धतीचा उर्मटपणा करायला अतिशय निर्ढावलेली यंत्रणा असणार ह्यात काही शंकाच नाही. आपली राजकीय पकड इतकी घट्ट आहे की कोणी ती हलवू शकणार नाही हा उर्मट विचार.

इतके गैरव्यवहार आणि प्रशासकीय गोंधळ घातलेला असताना सुद्धा परत परत एकच राजकीय पक्ष आणि एकच मुख्यमंत्री कसा काय लोकं निवडून देतात असा भाबडा प्रश्न मनात येतो. कारण देशाच्या इशान्येतील परिस्थिती फार वेगळी आहे. आपल्याला महाराष्ट्रात त्याची जाणीवच नाही. इतकी दहशत CPI ने निर्माण केली आहे की सर्वसामान्य लोकांना ह्याच्या खेरीज पर्याय असू शकतो हे ओळखायची ताकद सुद्धा उरलेली नाही. परत त्रिपुरा मध्ये ६८% जनता दारिद्र्यरेषेखाली. पोटच जेव्हा भरलेले नाही, तेव्हा राजकीय तत्वांवर कोण चर्चा करणार?

कुठेही जगभरात, डाव्या विचारसरणीची राजकीय यंत्रणा एका विशिष्ट पद्धतीने चालवली जाते. वर्गभेद कमी करण्याचे अमीष दाखवून, जनतेला दोन वेगळ्याच ‘वर्गात’ टाकले जाते – एक वर्ग म्हणजे CPI पक्षाचे कार्यकर्ते, काम करणारे व दुसरा वर्ग म्हणजे CPI पक्षाचे काम न करणारे. ह्या मुळे पारंपारीक वर्गभेद नष्ट तर होत नाहीच, उलट नव्या वर्गभेदामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व मात्र वाढत जाते. हे जगभर झालेले आहे आणि त्या मुळेच डावी, मार्क्सवादी राजवट कित्येक देशांनी उखडून काढली आहे किंवा ती आपोआपच कोलमडली आहे. सहाजीकच, ह्या प्रकारच्या राजकीय यंत्रणे मध्ये दहशत निर्माण करणे सोपे असते व जनतेला जितके गरीब, लाचार ठेवाल तितके चांगले असते. पोटात भूक असताना, कोण राज्याच्या विकासाची स्वप्ने बघेल? अश्या राजवटीला दीर्घकाळ सत्ता मिळते कारण दुसरी विचारसरणीचे बीज रोवूच दिले जात नाही, आणि कोणी प्रश्न विचारायला सुरूवात केलीच तर त्याला जीवानिशी मारले जाते. ऐकून धक्का बसतो, की आपल्याच देशाच्या एका राज्यात इतकी अंदाधुंद असू शकते, नाही का? परत परत निवडणूका जिंकल्या जातात, एकतर दहशतीमुळे किंवा बेइमानी करून. बूथ बंद करून सरळ लोकतंत्रेच्या यंत्रणेशी खेळ करून अनेक निवडणुकांमध्ये ‘यश’ संपादन केले आहे, ह्याला त्रिपुरा मधली जनता साक्षी आहे.
देवधरजी म्हणतात, ह्या वेळी परिस्थिती बदलली होती. केंद्रात मोदी सरकारची विकासासाठी उचलली जाणाऱ्या पाऊलांमुळे त्रिपुरावासियांना एक प्रकारचे बदलाचे वेध लागले होते. संपूर्ण देश पुढे जात असताना, परत आपण मागे राहणार की काय, ही काळजी त्रिपुराला लागली होती. एक आशेचा किरण ह्या राज्याला दिसू लागला. पण तरीही प्रश्न होताच की CPI ला टक्कर देऊ शकेल असा पर्याय कोण? अश्या वेळी, सुनील देवधरजींना त्रिपुरा सोपविण्यात आले. भा.ज.पा अध्यक्ष श्री. अमित शहा ह्यांनी देवधरजींना बोलावून सांगितले की “हम काॅंग्रेस मुक्त भारत बनाने का सपना साकार कर रहे है, आप काॅम्युनिस्ट मुक्त भारत का सपना साकार किजीये.” देवधरजी म्हणतात की त्या क्षणापासून त्यांनी त्रिपुरा विधानसभा जिंकेपर्यंत केवळ ह्याच ध्येयाने काम केले आहे.

संपूर्ण राज्यात केवळ १०,००० भा.ज.पा. सदस्यांपासून सुरूवात करून, आज जवळ जवळ २००,००० सदस्य जोडण्याचे काम भा.ज.पाच्या संघटनेने केले. संघ व भा.ज.पा चे संघटन कौशल्य इथे पणाला लावले. त्रिपुरा मध्ये जेथे सदस्य कमी होते तेथे सुद्धा प्रत्येक बूथ ला १० कार्यकर्ते तयार केले. एवढेच नव्हे, तर देवधरजी त्रिपुरेतील महिला मोर्चाला सलाम करतात. प्रत्येक बूथ ला १० महिला व पन्ना प्रमुख तत्वाप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी ६० मतदारांना सतत संपर्कात ठेवण्याची, अशी संघटात्मक व्यूह रचना त्रिपुरा मध्ये निर्माण केली गेली. ह्या मुळे, केंद्र सरकारच्या सकारात्मक कामामुळे निर्माण झालेल्या आशेला गल्ली-गल्लीत काम करणाऱ्या यंत्रणेची जोड मिळाली. आणि कित्येक वर्षांनंतर त्रिपुरावासीयांना आपण आपली परिस्थिती बदलू शकू असा विश्वास वाटू लागला. डुबणाऱ्याला भा.ज.पा च्या मोठ्या काठीचा आधार मिळाला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘लूक इस्ट, ॲक्ट इस्ट’ च्या योजनांचा फायदा दिसू लागला व त्रिपुराला परिवर्तनाची ओढ लागली.

नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक आनंद त्रिपुरा मध्ये झाला. गरीब त्रिपुरात ५०० व १००० च्या नोटा सर्वसामान्यांकडे नव्हत्याच. ह्या निर्णयाचा जोरदार फटका राज्यकर्त्यांना बसला, ज्याचा असुरी आनंद सर्वसामान्य जनतेला झाला, असे देवधरजी सांगतात. CPI ने नोटा बंदीला विरोध दर्शवला, तेव्हा त्रिपुरातील विचारवंतांनी मुख्यमंत्री माणिक सरकार ला प्रश्न विचारला की “मोदींनी तर तुमचे काम केले. गरीब-श्रीमंतांमधील भेदभाव कमी करण्याच्या प्रयत्नांना तुम्ही का समर्थन देत नाही?” ह्या मधून स्पष्ट दिसते की डाव्या विचारसरणीतील खोटेपणा व ढोंगीपणा लोकांसमोर येऊ लागला आहे व त्याच्या विरोधात आवाज उठवला जाऊ लागला आहे.

देवधरजींनी त्रिपुरातील कांडांचे वर्णन करताना तर पुण्यातील संवेदनशील श्रोता हळवा झाला. विरोधकांच्या केलेल्या हत्या, मुली व महिलांवर केलेले बलात्कार, खून ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्काराचे पडसाद जगभर उमटले, पण त्रिपुरेत त्याहून भयानक कांडाबद्दल कोणीही दखल सुद्धा घेतली नाही. गौरी लंकेश ह्या पत्रकाराच्या हत्येचा निषेध जोरात नोंदविला गेला, पण त्रिपुरातील सुदीप दत्त भौमीक पत्रकाराची पोलीसांकडून करण्यात आलेली निर्घृण हत्या मात्र चर्चेत आली नाही. असंख्य राजकीय कार्यकर्त्यांची हत्या लपवली गेली. ह्या सर्व वर्षानुवर्ष घडणाऱ्या अन्यायाविरूद्ध त्रिपुरातील लोकांनी कौल दिला आणि परिवर्तनाची सुरूवात आज नव्या उमेदीने त्रिपुरात होत आहे.

एका दृष्टीने नव्याने झालेले मुख्यमंत्री श्री. बिप्लाब कुमार देब ह्यांच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवला आहे, ह्याची जाणीव सगळ्यांना आहे, असे देवधरजी सांगतात. काहीच महिन्यांपूर्वी CPI च्या मंत्र्यांच्या बंगल्यातील सेप्टीक टॅंक मध्ये एका महिलेचा सापळा सापडला. कुठे कुठे काय-काय लपवले आहे आणि कुठून कुठून ते बाहेर येणार आहे हे थोड्याच दिवसात कळेल. वैयक्तिक व राजकीय पातळीवर इतकी कांड व गैरव्यवहार बाहेर येण्याकडे आहेत. तसेच त्रिपुरा ने एवढे कर्ज करून ठेवले आहे की दररोज रू. ५ कोटीचे व्याज राज्याने बरेच महिने चुकवीले आहे. हा वारसा असलेले राज्य मुख्यमंत्री बिप्लाब कुमार देब
ह्यांना नुसतेच चालवायचे नाही तर जलद गतीने पुढे न्यायचे आहे. ह्या कार्यात त्यांना खूप खूप शुभेच्छा.

 

त्रिपुरातील डाव्यांचा किंवा CPI चा पराभव एका वेगळ्या विकास व विचार धारणेच्या परिवर्तनाची चाहुल आहे. केरळ आता एकच भारतातील राज्य उरले आहे जिथे CPI चे सरकार आहे. त्यामुळे आता लढाई ही अस्तित्वासाठी असल्यामुळे, तीला प्रखर व कदाचित हिंसक वळण येईल असा अंदाज लावला जात आहे. शेजारीच त्रिणामुळ काॅंग्रेस चे राज्य असलेले पश्चिम बंगाल त्रिपुरातील CPI च्या पराभवाने हादरून गेले आहे. ईशान्येकडच्या एका छोट्या व कधीच कोणाच्या गिणतीत नसलेल्या राज्याने आज भारतातील राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. हीच ती चाहुल आहे जिथे सर्वसामान्य भारतीय नागरिक राजकीय पक्षांना सांगतो आहे की “विकास करा, नाहीतर चालते व्हा!”

No Comments

Post A Comment